बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. गुरुवारी राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. राज्यात गुरुवारी २८ हजाराहून अधिक पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे, तर ५२ हजाराहून याधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात गुरुवारी २८,८६९ नवीन रुग्णांची नोंद झाली तर ५२,२५७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले. तसेच ५४८ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णांची संख्या २३.२५ लाखावर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे २३,८५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन दिवसात राज्यात ३० हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या आठवड्यात दररोज सुमारे ४० हजारहून अधिक रुग्ण सापडत होते.
राज्यात बेंगळूर शहरी जिल्ह्यात ९,४०९ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर २५,७७६ रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. २० मे रोजीपर्यंत राज्यात एकूण २३,३५,५२४ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी १७,७६,६९५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.