शनिवारी 30 बसेसमधून 600 हून अधिक नागरिक दाखल, एकंदरित 2 हजारांच्या आसपास कामगार व अन्य नागरिक प्रवेशाच्या प्रतीक्षेत
प्रतिनिधी / काणकोण
गोव्याच्या विविध भागांमध्ये ‘कोविड-19’संबंधीच्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या कर्नाटकाच्या विविध भागांतील कामगार आणि अन्य नागरिकांना आपल्या गावी परतायचे वेध लागले असून पोळे चेकनाक्यावर त्यांची झुंबड उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 9 रोजी येथे सुमारे 30 बसेसमधून 600 हून अधिक नागरिक आले. 8 रोजी आलेले नागरिक जमेस धरता येथे जवळपास 2 हजार नागरिक कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी जमलेले आहेत.
कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्हय़ातील भटकळ वगळता अन्य भागांमध्ये जायला दोन्ही राज्यांनी परवानगी दिलेली असली, तरी 8 रोजी गोव्याच्या म्हापसा, हणजूण, वाघातोर, कळंगूट या भागांतून आलेले 500 पेक्षा अधिक नागरिक कर्नाटक सरकारने परवानगी नाकारल्यामुळे पोळे चेकनाक्यावर अडकून पडले आहेत. काहींनी अन्न-पाण्यावाचून उघडय़ावरच रात्र काढली. त्यात भर म्हणून 9 रोजी पहाटे 3 पासून कामगार आणि अन्य नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी विविध माध्यमांतून पोळे चेकनाक्यावर गर्दी करायला सुरूवात केली.
तासातासाने नागरिकांचा लोंढा वाढत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी दिली. कर्नाटकात जाण्यासाठी आलेल्या नागरिकांची वैद्यकीय तपासणी, पासेसची तपासणी यात खूप वेळ जात असल्यामुळे पोळे चेकनाक्यावरील गर्दी टाळण्यासाठी चव्हाण यांनी जवळजवळ 30 प्रवासी बसेस व काही खासगी कार्स माड्डीतळप येथे थोपवून ठेवल्या.
पोळे येथे मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त
काणकोणच्या पोलीस स्थानकावरील जवळजवळ अर्धे पोलीस पोळे चेकनाका, माड्डीतळप येथे कर्नाटकात जाण्यासाठी आलेली वाहने आणि नागरिकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. स्वतः निरीक्षक तुकाराम चव्हाण, उपनिरीक्षक रामचंद्र नाईक, धीरज देविदास, स्वदेश देसाई, साहाय्यक उपनिरीक्षक सूर्यकांत सावळ या सर्वांवर देखरेख ठेवून आहेत. पोळे चेकनाक्यावर गर्दी करू नका असे वारंवार या नागरिकांना सुनावण्याचे काम पोलीस करत असताना दिसत आहेत.
माजाळी चेकनाक्यावर बऱयाच जणांना रोखले
पोळे चेकनाक्यावर काणकोणचे उपजिल्हाधिकारी प्रीतिदास गावकर, मामलेदार विमोद दलाल, तालुका निरीक्षक दीपक देसाई, विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केलेले गणपती नाईक, जयदेव हळदणकर, आझाद वेर्णेकर, प्रशांत नाईक, प्रदीप पेडणेकर, प्रदीप आचारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई, रमेश शिरोडकर हेही देखरेख ठेवून आहेत. गोव्यातून आलेल्या सर्व कामगार आणि अन्य नागरिकांची वैद्यकीय तपासणी करूनच त्यांना कर्नाटकात पाठविण्यात येत असले, तरी 8 रोजी बऱयाच जणांना माजाळी चेकनाक्यावरील पथकाने मनाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकात जाण्यासाठी आलेल्या कित्येक कामगार व अन्य नागरिकांकडे गोव्यातील आधार कार्ड व मतदार ओळखपत्र आढळलेले आहे. अशांना कर्नाटकात प्रवेश नाकारण्यात आला.
अन्न-पाण्यावाचून नागरिकांचे हाल
पोळे येथील पेट्रोल पंप ते गोव्याच्या सरहद्दीपर्यंत मोठय़ा संख्येने बार आणि रेस्टॉरंट्स आहेत. त्यांना उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. हॉटेल, खानावळी खुल्या झालेल्या नाहीत. चेकनाक्यापर्यंत गोव्यातून एका वाहनात 25 प्रवासी याप्रमाणे लोकांना आणून सोडले जाते. माजाळी चेकनाक्यावर या नागरिकांना नेण्यासाठी कर्नाटक राज्याची वाहने तयार ठेवलेली आहेत. येथे उतरणाऱयांमध्ये वृद्ध, महिला, पुरुष तसेच लहान मुलांचा समावेश राहत असून 8 रोजी पोळे चेकनाक्यावर साधी पाण्याची बाटली देखील मिळाली नसल्यामुळे अन्न-पाण्यावाचून या नागरिकांचे खूपच हाल झाले. चेकनाक्यावरील गोव्यातील पोलिसांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून काही जणांची सोय केली. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक प्रशासनाने गोव्यातून येणाऱया 2 हजार लोकांसाठी खाणा-जेवणाची सोय कारवार येथे केलेली आहे.
माड्डीतळप ते पोळेपर्यंत चालत जाण्याचा प्रसंग
सावधगिरीचा उपाय म्हणून काणकोणच्या पोलिसांनी सर्व बसेस माड्डीतळप येथे थांबवून ठेवल्यामुळे आपला क्रमांक प्रथम लागावा यासाठी बऱयाच नागरिकांवर डोक्यावर सामानाच्या पिशव्या घेऊन तसेच एका हातात आपल्या मुलांना धरून पोळेपर्यंत चालत जाण्याचा प्रसंग आला. 8 रोजी जे नागरिक आले होते त्यांचीच अद्याप रवानगी झालेली नाही. त्यामुळे 9 रोजी जे कामगार आणि अन्य नागरिक या ठिकाणी आलेले आहेत त्यांची रवानगी करेपर्यंत मध्यरात्र उलटण्याची शक्यता या ठिकाणच्या अधिकाऱयांनी व्यक्त केली. त्याचबरोबर गोव्याच्या विविध भागांतून नागरिकांना घेऊन अजूनही बसेस येत आहेत. माजाळी चेकनाक्याच्या बाजूने गोव्यात प्रवेश करू पाहणाऱया लोकांच्या रांगा लागलेल्या आहेत. त्यांना नेण्यासाठी पोळे चेकनाक्यावर गोव्यातील वाहनांनी गर्दी केली आहे.
या गर्दीमुळे पोळे चेकनाक्यावरील वैद्यकीय पथकावर देखील ताण आलेला आहे. 24 तास सेवा बजावणारे चेकनाक्यावरील पोलीस, वैद्यकीय कर्मचारी, अन्य कर्मचाऱयांसाठी निवारा उभारण्यात आलेला आहे. मात्र या शेड्सवर लोखंडी पत्रे घालण्यात आल्यामुळे वाढत्या उकाडय़ाचा त्रास या कर्मचाऱयांना सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या. त्याचबरोबर पाऊस कधीही पडण्याची शक्यता असल्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी अधिक सुविधा या ठिकाणी तयार करण्याची मागणी करण्यात येत आहे.