बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात एसएसएलसी, पीयूसी बोर्ड परीक्षा २०२१ आयोजित करण्याचा अंतिम निर्णय आज जाहीर करण्यात आला. कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी बारावीची परीक्षा रद्द तर दहावीची परीक्षा होणार असल्याचे सांगितले. तसेच शिक्षणमंत्र्यांनी कर्नाटकात एसएसएलसीची परीक्षा जुलैच्या तिसर्या आठवड्यात होणार असल्याची घोषणाही केली.
दरम्यान, कर्नाटकचे शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी जाहीर केले की जुलैच्या तिसर्या आठवड्यात राज्यात एसएसएलसी परीक्षा घेण्यात येणार आहे. सर्व भाषा विषयांचा एक पेपर तर विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र या तीन मूलभूत विषयांचा एक पेपर होणार आहे. दरम्यान, दहावीची परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या आधारावर होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना ग्रेडच्या आधारावर निकाल मिळणार आहेत.
एसएसएलसी परीक्षेची तारीख ही परीक्षेपूर्वी २० दिवस आधी जाहीर केली जाणार आहे. परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर N९५ मास्क दिले जाणार आहेत. तसेच राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्यास परीक्षेच्या नियोजनात बदल केले जाण्याची शक्यता आहे.