बेंगळूर / प्रतिनिधी
कर्नाटकात गुरुवारी कोरोनाने नवा विक्रम नोंदविला. राज्यात गेल्या २४ तासांत ६,१२८ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकाच वेळी ३७९३ रूग्णांना कोरोनमुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता पर्यंत एकाच वेळी सर्वात जास्त व्यक्ती बरे होऊन घरी परातल्याची पहिलीच घटना आहे.
राज्यात एकूण संसर्ग झालेल्यांची संख्या १,१८,६३२ वर पोहोचली आहे. यापैकी ४६,६९४ रुग्ण कोरोनाला पराभूत करण्यात यशस्वी झाले आहेत. कोरोनामुळे आता पर्यंत २२३० रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील चार रुग्णांचा घरी मृत्यू झाला, तर सात रुग्णांना मृत अवस्थेत रुग्णालयात आणण्यात आले होते. तर बंगळूरमध्ये ३३७ आणि राज्यात एकूण ६२० रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत.
राज्यात गेल्या २४ तासांत एकूण ३८,०९५ नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये २०,४८८ जलद प्रतिजैविक चाचण्यांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण १३,१३,८५६ नागरिकांची तपासणी केली आहे. यापैकी१,२५,०९१ लोकांची जलद प्रतिजैविक तपासणी केली आहे.
बेंगळूरमध्ये सर्वाधिक रुग्ण तर आतापर्यंत हजाराहून अधिक मृत्यू
राज्यात गुरुवारी नवीन ६,१२८ रुग्णांपैकी २,२३३ रुग्ण एकट्या बेंगळूर शहरात सापडले आहेत. बेंगळूरमध्ये संक्रमित लोकांची एकूण संख्या ५३,३२४ वर पोहोचली आहे. यापैकी, ३६,५२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.१५,७९१ रूग्ण बरे झाले आहेत. त्यापैकी गुरुवारी १,९१२ रूग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत कोरोनामुळे १,००९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.