बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढत असताना राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत होती. याची दखल घेत केंद्राकडून राज्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे. दरम्यान, कर्नाटकात आज नववी ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाली. झारखंडहून १२० टन द्रव वैद्यकीय ऑक्सिजन (एलएमओ) घेऊन आलेली नववी ऑक्सिजन एक्सप्रेस ट्रेन आज बेंगळूर येथील व्हाइटफील्डच्या इनलँड कंटेनर डेपो येथे आली.
नैऋत्य रेल्वे विभागाने सांगितले, की रविवारी सकाळी ७.३० वाजता ट्रेन दाखल झाली. शुक्रवारी रात्री ११.३५ वाजता झारखंडमधील टाटानगर येथून ही ऑक्सिजन एक्सप्रेस निघाली होती. या ऑक्सिजन एक्स्प्रेसची जलद वाहतूक सक्षम करण्यासाठी रेल्वेने सिग्नल-रहित ‘ग्रीन कॉरिडोर’ तयार केले होते.
या ट्रेनमध्ये प्रत्येकी २० टन एलएमओसह सहा क्रायोजेनिक कंटेनर होते. आतापर्यंत कर्नाटकला रेल्वेमार्गाने १०६२.१४ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन मिळाला आहे.