ऑनलाइन टीम / कर्नाटक :
कर्नाटक सरकारकडून सोमवारी कर्नाटकमध्ये इतर राज्यातून तसेच देशाच्या इतर भागातून प्रवेश करणाऱ्या नागरिकांच्या चाचणीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.
कर्नाटकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. कर्नाटकात आत्तापर्यंत 5,760 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कालपासून या नवीन मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी सुरू केली आहे.
या मार्गदर्शक तत्वांमध्ये मुख्यतः कर्नाटकमध्ये येणाऱ्या प्रवाशांनी सेवा सिंधू पोर्टलवर स्वयं नोंदणी करणे अनिवार्य केले गेले आहे. यामध्ये नाव, पत्ता, मोबाईल नंबर तसेच इतर वैयक्तिक माहिती भरणे आवश्यक आहे.
व्यावसायिक कारणासाठी कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना त्यांचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता याबरोबरच कर्नाटकात कोणाला भेटायचे आहे, भेटीचे कारण आणि परत जाण्याची तारीख नोंदवणे आवश्यक आहे. तसेच स्थलांतरित मजुरांना ते कोणत्या राज्यातून आलेले आहेत, याबाबत पूर्ण माहिती देणे आवश्यक आहे.
याबरोबर कर्नाटकात येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची वैद्यकीय तपासणी सीमेवर, विमानतळावर, रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड आदी ठिकाणी केली जाणार आहे.
ज्यांच्या हातावर क्वारंटाइन शिक्का असेल अशा लोकांना 14 दिवसांसाठी विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. यानंतर त्यांच्या टेस्ट घेतल्या जातील व त्यामध्ये यातील कोणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना कोविड केअर रुग्णालयात पाठवले जाईल.
ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये ज्यांच्या हातावर शिक्का आहे, त्यांना आपल्या घरावर होम क्वारंटाइन असे पोस्टर लावणे अनिवार्य आहे. ग्रामीण भागात ग्रामपंचायत तर शहरी भागात वॉर्ड लेव्हल टीम या लोकांची जबाबदारी घेतील. या काळात घरगुती हिंसाचार, आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ला यासारखे प्रकार घडल्यास त्यांच्या विरुद्ध तक्रार करून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्यात येईल.