बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना संसर्गाची नवीन प्रकरणे मंगळवारी दहा हजाराहून कमी झाली. मंगळवारी राज्यात ९,८०८ नवीन रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर २३,४४९ रुग्ण कोरोनातून बरे झाल्यानंतर घरी परतले. तसेच राज्यात मंगळवारी विविध जिल्ह्यात कोरोनामुळे १७९ रुग्णांचा बळी गेला. दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची एकूण सक्रिय रुग्ण संख्या २,२५,००४ वर पोहोचली आहे.
दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारने पूर्ण लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार राज्यात पूर्ण लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. त्यांनतर राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा वेग मंदावत गेला. सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी कमी होत आहे. मंगळवारी राज्यात १० हजाराहून कमी रुग्णांची भर पडली. राज्यात १४ जूनपर्यंत पूर्ण लॉकडाऊन आहे. ज्या जिल्ह्यात कोरोना सकारात्मकता दर ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये अनलॉक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्यात मंगळवारी सकारात्मकतेचा दर ७.५३ टक्के होता. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात २,०२८ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याच वेळी ७,६६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर जिल्ह्यात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला.