बेंगळूर/प्रतिनिधी
शिवमोगा येथील सोगणे विमानतळ जवळ दोन वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटक सामग्री जप्त केल्याने काही काळ गोंधळ उडाला. दरम्यान पोलिसांनी शहरात हाय अलर्ट जरी केला. दरम्यान काही दिवसापूर्वी खाणीत झालेल्या स्फोटामुळे काही व्यक्तींचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाने स्फोटके बाळगण्याबाबत कडक निर्बंध लागू केले आहेत.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन वाहनांमध्ये ९०४किलो जिलेटिन आणि ३,२६७ डिटोनेटरसह अनेक स्फोटके ठेवण्यात आली होती. एका मालवाहू वाहनामध्ये ३६ बॉक्समध्ये जिलेटिन आणि नऊ पिकअप वाहनांमध्ये ३,२६७ इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स, नऊ मीटरची ७९ एक्सेल्स, तीन मीटरच्या १०५ एक्सेल्स ठेवण्यात आल्या आहेत. माहिती मिळताच तुंगा शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी वाहने ताब्यात घेऊन सर्व स्फोटक साहित्य ताब्यात घेतली. पोलिसांनी बेंगळूरहून बॉम्ब विल्हेवाट पथकाला चौकशीसाठी बोलावले. या पथकाने सर्व स्फोटक साहित्य सुरक्षितपणे ठेवले आहे.
विमानतळाजवळील दगडी कोळशासाठी परवानगी देण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. तेथील खडक फोडून विमानतळ उभारणीसाठी खडकांचा वापर करण्याचे नियोजन होते. स्फोटक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी चिक्कबळ्ळापूर येथील कंपनीशी करार केला होता. स्फोटक सामग्रीने भरलेले वाहन सोडल्यामुळे गोंधळ उडाला.
पोलिसांनी सांगितले की,हुनसोडू खाणीजवळ स्फोटानंतर स्फोटक साहित्याचा वापर व पुरवठा करण्याबाबत काही कठोर नियम लागू केले गेले आहेत. कंपनीने स्फोटक साहित्याचा पुरवठा करण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळूरमधील पेट्रोलियम व विस्फोटक सुरक्षा संघटनेची परवानगी घेण्याची सूचना केली. त्यामुळे कंपनीचे दोन्ही अधिकारी वाहन सोडूनबेंगळूरला परवानगी मिळवण्यासाठी गेले. तुंगा नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक यांनी कंपनीवर स्फोटक साहित्याचा पुरवठा करण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे