बेंगळूर/प्रतिनिधी
देशात काही राज्यांमध्ये कोरोना झालेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस विषाणूचा संसर्ग वाढत असल्याचे समोर आले आहे. दरम्यान कर्नाटकातही कोरोना रुग्णांना या विषाणूचा संसर्ग झाला आहे. राज्यात म्युकरमायकोसिसच्या घटनांमध्ये वाढ होत असतान या घटना रोखण्यासाठी आणि रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत यासाठी सरकारने तज्ञांची अभ्यास समिती गठीत केली आहे. समितीचे काम म्हणजे संसर्गाचे स्त्रोत शोधणे. राज्यात आतापर्यंत ९७ रूग्णांना ‘ब्लॅक फंगस’ची लागण झाली आहे.
अभ्यासासाठी समिती गठीत
राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी सोमवारी वाढत्या म्युकरमायकोसिस रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांची बैठक घेत एक समिती गठीत केली. या समितीचे प्रमुख बेंगळूर मेडिकल कॉलेज आणि रिसर्च इन्स्टिट्यूटमधील ईएनटी विभागाचे प्रमुख डॉ. सतीश असणार आहेत. तसेच समितीत मिंटो रुग्णालयाचे बी. एल. सुजाता राठोड आणि नारायण नेत्रालयाचे डॉ. भुजंग शेट्टी आहेत. राज्य सरकारने काळ्या बुरशीला हा एक अधिसूचित रोग असल्याचे म्हटले आहे. तसेच सर्व रुग्णालये आपल्या रूग्णांची माहिती सरकारला देतील.
सोमवारी तज्ज्ञ समितीशी झालेल्या बैठकीनंतर आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी समितीला संसर्गाचे स्रोत शोधण्यास सांगितले. ऑक्सिजन अशुद्धी, ह्युमिडिफायर्स किंवा व्हेंटिलेटर सिस्टम उपकरणाच्या समस्यांमुळे रुग्ण काळ्या बुरशीने ग्रस्त आहेत का हे शोधणे महत्वाचे आहे.
मंत्री म्हणाले की, रविवारपर्यंत राज्यात काळ्या बुरशीचे ९७ रुग्ण आढळले आहेत. सर्वांवर बोरिंग रुग्णालयात प्रायोगिक उपचार सुरू आहेत. हा संसर्गजन्य रोग नाही असे सांगून लोकांना काळजी करू नका असे आवाहन त्यांनी केले. तज्ञ समिती परिस्थितीचे मूल्यांकन करेल आणि लवकरच आपला अहवाल सरकारला देईल.
उपचार करणारी रुग्णालये
म्हैसूर मेडिकल कॉलेज, शिवमोगा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, गुलबर्गा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, कस्तुरबा मेडिकल कॉलेज, मणिपाल आणि मंगळूरमधील वेनलॉक सरकारी रुग्णालय ही रूग्णाच्या उपचारासाठी प्रादेशिक केंद्र आहेत. तसेच काळ्या बुरशीचा संसर्ग झालेले रुग्ण लवकरच या रुग्णालयात उपचार घेण्यास सक्षम असतील.