बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. लॉकडाऊननंतर राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तर पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या राज्यात जास्त आहे. शुक्रवारी कर्नाटकात नव्याने लागण झालेल्या रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. शुक्रवारी राज्यात १६,०६८ नवीन रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला. तर २२,३१६ रुग्ण बरे झाल्यानंतर घरी परतले.
दरम्यान राज्यात सध्या कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या २,८०,१८६ इतकी आहे. शुक्रवारी राज्यात ३६४ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सकारात्मकतेचे प्रमाण १०.६६ टक्क्यांवर आले आहे. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात ३,२२१ नवीन रुग्ण आढळले. तसेच ६,२२० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून घरी परतले. तर २०६ रुग्णांचा कोरोनाने बळी गेला आहे.