बेंगळूर/प्रतिनिधी
देशात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची घोषणा केली आहे. कर्नाटकात लवकरच नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) लागू करणार आहे. त्यांनतर नवीन शिक्षण धोरण राबविणारे कर्नाटक देशातील पहिले राज्य असेल, असे मत उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. सी.एन. अश्वथनारायण यांनी व्यक्त केले आहे.
सोमवारी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्ये आणि अंमलबजावणी’ या विषयावर आयोजित पाच दिवसीय ऑनलाइन कार्यशाळेच्या उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान मंत्री अश्वथनारायण यांनी राज्य सरकार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आवश्यक प्रशासकीय सुधारणा व कायद्यात दुरुस्तीसाठी सर्व तयारी करीत आहे. नवीन शिक्षण धोरण राबविणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य बनेल. बेंगळूर विद्यापीठाने या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
उपमुख्यमंत्री अश्वथनारायण यांनी राज्य सरकार स्पष्ट अजेंडा आणि विशिष्ट लक्ष्य घेऊन पुढे जात आहे. नवीन शिक्षण धोरण राबविण्यासाठी सरकारने एस.व्ही. रंगनाथ यांच्या नेतृत्वात टास्क फोर्सची स्थापना केली आहे. चार-पाच दिवसांत टास्क फोर्स आपला अंमलबजावणी अहवाल आणि आराखडा दाखल करेल. यानंतर मुख्यमंत्री आणि प्राथमिक शिक्षणमंत्री यांच्याशी सल्लामसलत करून याची अंतिम अंमलबजावणी होईल असे ते म्हणाले.