बेंगळूर/प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने काही राज्यात पुन्हा कडक निर्बंध राबविण्यात येत आहेत. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान कर्नाटकात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाने ५०० चा टप्पा ओलांडला. शुक्रवारी राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले होते. राज्यात शनिवारी ५२३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर राज्यातील विविध जिल्ह्यातून सर्वाधिक ३८० रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णायातून घरी परतले. तर ४ कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५,६३८ इतकी आहे. राज्यात आतापर्यंत १२,३२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वाधिक संख्याही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहे. तसेच सध्या उपचारात असणाऱ्या रुग्णांची सर्वाधिक संख्या बेंगळूरमध्येच आहे. दरम्यान शनिवारी जिल्ह्यात ३२९ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. तर २४३ रुग्ण कोरोनावर मात करत रुग्णालयातून घरी परतले. तसेच जिल्ह्यात सध्या सक्रिय प्रकरणांची संख्या देखील ३,८३५ वर पोहोचली आहे. दरम्यान शहरी जिल्ह्यात कोरोना संक्रमणामुळे आतापर्यंत ४,४७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.