बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी कर्नाटकमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत घट झालेली पाहायला मिळाली. राज्यात सलग तिसर्या दिवशी नवीन कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या कमी झाली. सोमवारी राज्यात कोरोनाचे ५,०१८ नवीन रुग्ण सापडले. नेहमी प्रमाणे बेंगळूर शहरी जिल्ह्यात सर्वाधिक रुग्णांची भर पडली. बेंगळूर जिल्ह्यात सोमवारी २,४८१ नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.
राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होती. सोमवारी ८,००५ रुग्णांना बरे झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान राज्यात सोमवारी एकूण ६४ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी १७ जण बेंगळूर मधील आहेत. राज्यात आतापर्यंत १०,५४२ लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे.
सोमवारी राज्यात उपचारात असणाऱ्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या १,०६,२१४ होती. यापैकी बेंगळूरमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ६४,५३६ इतकी आहे. राज्याची राजधानी असलेल्या बेंगळूर शहरी जिल्ह्यात सोमवारी २,३६३ रुग्ण बरे झाल्याने घरी परतले. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,५४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.