महापूर-अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे केंद्र सरकारकडून मदत
प्रतिनिधी/ बेंगळूर
महापूर आणि अतिवृष्टीमुळे मागील वर्षी राज्यातील 13 जिल्हय़ांना मोठय़ा प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे विलंबाने का होईना, पण केंद्र सरकारने कर्नाटक राज्यासाठी दुसऱया टप्प्यात 1869.85 कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर करण्यास संमती दर्शविली आहे. केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात राज्यासाठी 1200 कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामुळे दोन टप्प्यात राज्याला एकूण 3069.85 कोटी रुपये मिळाल्यासारखे आहे.
सोमवारी नवी दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱयांची उच्चस्तरिय बैठक झाली. यावेळी 7 राज्यांना एकूण 5,908 कोटी रु. मदतनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्नाटकाला सर्वाधिक 1869.85 कोटी रुपये मदतनिधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या टप्प्यात कर्नाटकाने मोठय़ा मदतनिधीची अपेक्षा बाळगली होती. पण अत्यंत कमी मदत दिल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. दरम्यान, मागील आठवडय़ात गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी राज्य दौऱयावर आल्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी राज्यात पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली होती. केंद्राकडून राज्याला अपेक्षित मदत न मिळाल्याबद्दल येडियुराप्पांनी पंतप्रधानांसमोर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर तीनच दिवसांत केंद्र सरकारने कर्नाटकासह सात राज्यांना मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात मागील वर्षी ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसामुळे शेतकऱयांसह सर्वसामान्य जनतेला मोठा फटका बसला होता. शेतीसह मालमत्तेची प्रचंड हानी झाली होती. अतिवृष्टीमुळे 35 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. याबाबतची माहिती राज्य सरकारने पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाला दिली होती.
कर्नाटकाला सर्वाधिक मदत
अतिवष्टीमुळे नुकसान झालेल्या राज्यातील जनतेच्या मदतीसाठी आणि विकासकामांकरिता राज्य आपत्ती निवारण निधीसाठी दुसऱया टप्प्यात केंद्राने 1869.85 कोटी रु. देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे मध्यप्रदेशला 1749.73 कोटी रु., महाराष्ट्राला 959.93 कोटी रु. आसाम – 616.63 कोटी रु., हिमाचल प्रदेश – 284.93 कोटी रु., उत्तरप्रदेश – 367.17 कोटी रु., त्रिपुरा – 63.32 कोटी रु. देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.