प्रतिनिधी / बेंगळूर
कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनात जे सहभाग घेणार आहेत त्या सर्वांनी कोरोनाची चाचणी करणे अनिवार्य असल्याचे सभापती विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी सांगितले आहे.
अधिवेशन सुरू होण्यापूर्वी आमदार आणि माध्यम व्यक्तींसह सर्व सहभागी व्यक्तींची चाचणी ७२ तास आधी करावी लागेल. तालुका व जिल्हा पातळीवरील आमदारांसाठी आरटी-पीसीआर चाचण्या घेण्यात येतील तर अधिकारी आणि माध्यम व्यक्तींची १८ सप्टेंबर रोजी बेंगळूर येथे चाचणी करण्यात येणार आहे. कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र सहभाग घेण्यासाठी बंधनकारक असेल असे सभापतींनी म्हंटले आहे. कर्नाटक विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २१ ते ३० सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.