वृत्तसंस्था / बेंगळूर
विद्यमान विजेता आणि यजमान कर्नाटकाने विजय हजारे करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. रविवारी क गटातील येथे झालेल्या सामन्यात कर्नाटकाने रेल्वेचा 10 गडय़ांनी पराभव केला. कर्नाटक संघातील फलंदाज देवदत्त पडिक्कलने सलग तिसरे शतक झळकविले. या स्पर्धेतील अन्य सामन्यात केरळने बिहारचा तर उत्तरप्रदेशने ओडिशाचा पराभव केला.
कर्नाटक आणि रेल्वे यांच्यातील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना रेल्वे संघाने 50 षटकांत 9 बाद 284 धावा जमविल्या. प्रथम सिंगने 129 धावा झळविल्या. कर्नाटकातर्फे श्रेयस गोपालने 3 तर सुचितने 2 गडी बाद केले. त्यानंतर कर्नाटकाने 40.3 षटकांत बिनबाद 285 धावा जमवित हा सामना 10 गडय़ांनी जिंकला. सलामीचा फलंदाज देवदत्त पडिक्कलने 125 चेंडूत 9 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 145 धावा तर रविकुमार समर्थने 118 चेंडूत 17 चौकारांसह नाबाद 130 धावा झोडपल्या. या स्पर्धेत पडिक्कलचे हे सलग तिसरे शतक आहे. त्याने यापूर्वी ओडिशा संघाविरूद्ध 152 तर केरळविरूद्ध नाबाद 126 धावा झळकविल्या होत्या. या विजयामुळे कर्नाटकाने क गटातून आघाडीचे स्थान घेत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. या गटात उत्तर प्रदेश दुसऱया स्थानावर आहेत.
बिहार आणि केरळ यांच्यातील सामन्यात केरळने बिहारचा 9 गडय़ांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बिहारचा डाव 40.2 षटकांत 148 धावांत आटोपला. त्यानंतर केरळने 1 बाद 149 धावा जमवित विजय नोंदविला. रॉबिन उथप्पाने नाबाद 87 तर सॅमसनने नाबाद 24 धावा जमविल्या. केरळ संघातील वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतने 4 तर सक्सेनाने 3 गडी बाद केले.
उत्तरप्रदेशने ओडिशाचा 6 गडय़ांनी पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ओडिशाचा डाव 40.1 षटकांत 148 धावांत आटोपला. त्यानंतर उत्तरप्रदेशने 21.4 षटकांत 4 बाद 150 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक
रेल्वे 50 षटकांत 9 बाद 284, कर्नाटक 40.3 षटकांत बिनबाद 285
बिहार 40.2 षटकांत सर्वबाद 148, केरळ 18.5 षटकांत 1 बाद 149 ओदिशा 40.1 षटकांत सर्वबाद 148, उत्तरप्रदेश 21.4 षटकांत 4 बाद 150