प्रतिनिधी / सोलापूर
भाजीपाला खरेदीसाठी मंद्रूप येथे दुचाकीवरुन जात असताना सोरेगावजवळ कर्नाटक राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीच्या चालकाने दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पद्मावती तुकाराम निम्बर्गीकर असे अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर संजय अमोगसिद्ध जोडमोटे हे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी सकाळी चैतन्य भाजी मार्केट येथून पद्मावती व संजय असे दोघे दुचाकीवरून मंद्रूप येथे निघाले होते. सुरेगाव येथील अमर नगरजवळ पोहोचल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या कर्नाटक एसटीच्या चालकाने त्यांच्या दुचाकीला ठोकरले.
या अपघातामध्ये पद्मावती आणि संजय हे खाली पडून जखमी झाले.
त्यांच्या डोक्यात मार लागला होता. या दोघांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु पद्मावती यांचा या अपघातात जखमी होऊन मृत्यू झाला. तर संजय हे जखमी असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.