बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील पोटनिवडणुकीसाठी बुधवारी राजराजेश्वरी नगर (आरआर नगर) विधानसभा मतदार संघातील भाजप उमेदवार मुनिरत्न यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तर काँग्रेसकडून एच. कुसुम यांनीही आज याच मतदारसंघातून पोटनिवडणुकीसाठीआपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुनिरत्न यांनी आर. आर. नगर येथील बीबीएमपी कार्यालयात अर्ज सादर केला. सिरा विधानसभा मतदार संघासह आर. आर. नगर मतदार संघासाठी ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुक होणार आहे. आर. आर. नगर मतदार संघातून निवडून आलेले काँग्रेसचे आमदार एन. मुनिरत्न यांना पक्ष विरोधी कारवाई केल्याने विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवले होते. मुनिरत्न हे काँग्रेसमधून बीजेपीमध्ये दखल झाले आहेत.
चित्रपट निर्माता असलेल्या मुनिरत्न यांनी २०१३ आणि २०१८ मध्ये दोनदा कॉंग्रेसकडून आर. आर. नगर मतदार संघातून विजय मिळविला होता. २०१८ च्या निवडणुकीत, मुनिरत्न यांना १.०८ लाख मते मिळाली होती, त्यानंतर भाजपाचे मुनिराजू गौडा यांनी ८२ हजार आणि जद (एस) चे उमेदवार जी.एच. रामचंद्र यांनी ६० हजाराहून अधिक मते मिळाली होती.