योजनेची 97.07 टक्के प्रगती साध्य
प्रतिनिधी / बेंगळूर
प्रधानमंत्री कृषी सम्मान योजनेची अंमलबजावणी करण्यात कर्नाटक राज्य देशात आघाडीवर आहे. राज्याने या योजनेत 97.07 टक्के प्रगती साधली आहे. त्यामुळे 24 फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद सरकारकडून राज्याच्या वतीने आपण पुरस्कार स्वीकारणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी दिली.
गुलबर्गा जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रधानमंत्री कृषी सम्मान योजनेची उत्तम पद्धतीने जारी केलेल्या पाच राज्यांची निवड केंद्र सरकारने केली आहे. त्यामध्ये कर्नाटकाने प्रथम स्थान पटकावणे अभिमानास्पद आहे. ही योजना यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केलेले सर्व अधिकारी आणि कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत, असे ते म्हणाले.
मार्च 8 रोजी मुख्यमंत्री येडियुराप्पा राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱयांना कोणत्याही प्रकारे अन्याय होणार नाही याची खबरदारी घेत कृषी क्षेत्रासाठी अनुदान देण्यात यावे. या क्षेत्राला मिळणाऱया अनुदानात कपात करू नये अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. दुर्घटनेत गाय किंवा बैल मृत्यूमुखी पडल्यास मदत देण्याची आणि चाऱयाचे ढिग किंवा पिकांच्या राशी आगीत भस्मसात झाल्यास मदत देण्याच्या योजनेची घोषणा आणि आकस्मिकपणे शेतकऱयाचा मृत्यू झाल्यास देण्यात येणाऱया मदतीची रक्कम 2 लाखावरून 5 लाखापर्यंत वाढविण्याची विनंतीही केल्याचे त्यांनी सांगितले. गुलबर्गा जिल्हय़ात राज्य सरकारच्या अतिरिक्त प्रोत्साहनधनासह केंद्र सरकारचे 2,61,738 प्रोत्साहनधन लाभार्थींना वितरीत केले आहे. केंद्र सरकारकडून 231.79 कोटी रु. व राज्य सरकारकडून 180.54 कोटी रु. असे एकूण 412.33 कोटी रु. शेतकऱयांच्या खात्यावर जमा केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.