बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (केएसआरटीसी) जुन्या स्क्रॅप बसला महिला शौचालयात रुपांतर केले आहे. यासाठी सुमारे बारा लाख रुपये खर्च झाला आहे. ही रक्कम बेंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. एकूण किंमत 12 लाख रुपये आहे. महिला शौचालय बसमध्ये तीन भारतीय शौचालये, दोन पाश्चात्य शौचालये, सॅनिटरी नॅपकिन्स, नॅपकिन वेंडिंग मशीनची व्यवस्था केएसआरटीसीने केली आहे. प्रवाश्यांना त्याचा फायदा होईल. कोणत्याही राज्य रस्ते परिवहन महामंडळाने देशात प्रथमच महिला शौचालय बस तयार केली आहे.
केम्पेगौडा बस स्थानकाच्या पहिल्या टर्मिनलवर गुरुवारी झालेल्या समारंभात महिला शौचालय बसचे उद्घाटन उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री लक्ष्मण एस. सावदी यांनी केले. यावेळी केएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक शिवयोगी सी. कलसड, संचालक दक्षता आणि सुरक्षा रामनिवास सप्टे, संचालक पी अँड आय व्यंकटेश टी. उपस्थित होते.
या बसमध्ये वापरली जाणारी वीज सौर उर्जेवर आहे. बसमध्ये सोलर सेन्सर लाइट्स, हँड वॉशिंग (वॉश बेसिन), बेबी फीडिंग प्लेस आणि बेबी डायपर रिप्लेसमेंट रूम आहे. स्वच्छतेच्या दिशेने हे केएसआरटीसीचे एक मोठे पाऊल असल्याचे महामंडळाने म्हंटले आहे. बसस्टॉपवरील महिला प्रवाश्यांना त्याचा फायदा होणार आहे. कोणत्याही राज्य रस्ते परिवहन महामंडळाने अशा प्रकारे बस तयार केली नसून केएसआरटीसीने ही देशात प्रथमच महिला शौचालय बस तयार केली आहे.