वृत्तसंस्था/ चेन्नई
2022 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील विविध सामन्यांत कर्नाटक, केरळ, उत्तराखंड या संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय नोंदविले. दरम्यान रेल्वे व पाँडिचेरी तसेच आंध्रप्रदेश व सेनादल यांचे सामने अनिर्णित राहिले.
रणजी स्पर्धेतील इलाईट क गटातील रविवारी येथे झालेल्या सामन्यातील शेवटच्या दिवशी कर्नाटकाने जम्मू-काश्मीरचा 117 धावांनी दणदणीत पराभव केला. कर्नाटकाने पहिल्या डावात 302 धावा जमविल्यानंतर जम्मू-काश्मीरचा पहिला डाव 93 धावांत आटोपला. त्यानंतर कर्नाटकाने दुसरा डाव 3 बाद 298 धावांवर घोषित केला. जम्मू-काश्मीरचा दुसरा डाव 98.5 षटकांत 390 धावांत आटोपला. कर्नाटकाच्या प्रसिद्ध कृष्णाने 59 धावांत 4 तर श्रेयस गोपालने 155 धावांत 4 गडी बाद केले. या विजयामुळे कर्नाटकाने क गटात दोन सामन्यांतून 9 गुणांसह पहिले स्थान मिळविले आहे. जम्मू-काश्मीरचा संघ 6 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. जम्मू-वाश्मीरचा पुढील सामना रेल्वेबरोबर तर कर्नाटकाचा प्राथमिक गटातील शेवटचा सामना पाँडिचेरीबरोबर होणार आहे. रेल्वे संघाने क गटात 4 गुणांसह तिसरे स्थान मिळविले आहे.
क गटातील रेल्वे आणि पाँडिचेरी यांच्यातील सामना अनिर्णित अवस्थेत संपला. या सामन्यात पाँडिचेरीने पहिल्या डावात 342 धावा जमविल्यानंतर रेल्वे संघाने आपला पहिला डाव 9 बाद 525 धावांवर घोषित केला. त्यानंतर पाँडिचेरीने दुसऱया डावात 62 षटकांत 3 बाद 208 धावा जमविल्या. रेल्वे संघाने या सामन्यात पाँडिचेरीवर पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीमुळे 3 गुण मिळविले.
संक्षिप्त धावफलक
कर्नाटक प. डाव सर्वबाद 302, जम्मू-काश्मीर प. डाव सर्वबाद 93, कर्नाटक दु. डाव 3 बाद 298 डाव घोषित, जम्मू-काश्मीर दु. डाव 98.5 षटकांत सर्वबाद 390.
पाँडिचेरी प. डाव सर्वबाद 342, रेल्वे प.डाव- 9 बाद 525 डाव घोषित, पाँडेचेरी दु.डाव 62 षटकांत 3 बाद 208.
रणजी स्पर्धेतील इलाईट अ गटातील रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी केरळने गुजरातचा 8 गडय़ांनी पराभव करत पूर्ण गुण वसूल केले. केरळ संघातील कुनूमलने शानदार नाबाद शतक (108) तसेच कर्णधार सचिन बेबीने 62 धावा झळकविल्या. गुजरातने केरळला विजयासाठी 214 धावांचे आव्हान दिले होते. केरळने 2 बाद 214 धावा जमवित हा सामना जिंकला. या सामन्यात कुनूमलने पदार्पणात शतक झळकविल्याने त्याला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. केरळने पहिल्या डावात गुजरातवर 51 धावांची आघाडी मिळविली होती. त्यामुळे या सामन्यात केरळने 6 गुण मिळविले आहेत. गुजरात संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे.
इलाईट इ गटातील रविवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी उत्तराखंड संघाने राजस्थानचा 299 धावांनी दणदणीत पराभव केला. उत्तराखंडने इ गटात 12 गुणांसह आघाडीचे स्थान मिळविले आहे. उत्तराखंड संघाने या सामन्यात 6 गुण मिळविले तर राजस्थानला एकही गुण मिळाला नाही. इ गटातील आंध्रप्रदेश आणि सेनादल यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. आंध्रप्रदेशला 3 गुण तर सेनादलाला 1 गुण मिळाला.
संक्षिप्त धावफलक ः उत्तराखंड प. डाव सर्वबाद 337, राजस्थान प. डाव सर्वबाद 129 उत्तराखंड दु. डाव 7 बाद 246 डाव घोषित, राजस्थान दु. डाव सर्वबाद 155.
आंध्रप्रदेश प. डाव 389, सेनादल प. डाव सर्वबाद 343, आंध्रप्रदेश दु. डाव 4 बाद 220.