बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमधील कोरोनाची दुसरी लाट जीवघेणी असल्याचे सिद्ध होत आहे. राज्यात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन कडक नियमावली राबवित आहे. कर्नाटक सरकारने राज्यातील १० जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू केला आहे. दरम्यान राज्यात कोरोनाविषयक कडक निर्बंध लागू करूनही राज्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. याचबरोबर मृत्यू दरही वाढला आहे. राज्यात गुरुवारी, कोरोनाचे १४,७३८ रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कर्नाटकात कोरोनाने त्यापूर्वीचे सर्व विक्रम मोडले आहेत. राज्यात कोरोनाची दुरी लाट भयंकर असून जीवघेणी असू शकते.
राज्यात गेल्या चोवीस तासात ६६ संक्रमित लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ३० रुग्णांचा मृत्यू बेंगळूर शहरी जिल्ह्यात झाला आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार गुरुवारी ३,५९१ रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परत आले आहेत.
दरम्यान राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ९६,५६१ आहे. गुरुवारपर्यंत राज्यात कोविडमुळे एकूण १३,११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोना परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. जिल्ह्यात गुरुवारी १० हजारहून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. तर ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान गुरुवारी जिल्ह्यात १०,४९७ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर १८०७ रुग्ण कोरोनावर विजय मिळवीत रुग्णालयातून घरी परतले. दरम्यान बेन्गफ्लुर शरि जिल्ह्यात गुरुवार पर्यंत कोरोना संक्रमणामुळे ४,९६३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.