बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात अनेक प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातून बरेचशे लोक बरे झाले आहेत तर काही जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये राज्यातील कोरोनामुळे ४४ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांनी गुरुवारी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व ४४ पोलिसांच्या कुटूंबाला सरकारकडून जाहीर करण्यात आलेली ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत ४४ पोलिसांनी आपला जीव गमावला आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांना मदत, विमा, इतर फायदे आणि कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देणार असल्याचे सूद यांनी म्हंटले आहे.
पोलीस कर्मचाऱ्याच्या निधनानंतर ४८ तासांच्या आत जाहीर केलेली ३० लाख रुपयांची मदत देण्यात आली होती. सूद यांनी राज्यातील इतर पोलीस अधिकाऱ्यांना गंभीर आजार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मुक्तपणे रजा मंजूर करण्याचे निर्देश दिले आहेत.