बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना चाचण्या उशिरा सुरूवात झाल्या असल्या तरी कर्नाटकने २५ लाख कोरोना चाचणीचा टप्पा ओलांडला आहे. तर दैनंदिन चाचणी क्षमतेतही वाढ केली आहे. कर्नाटक आता दर दशलक्ष लोकसंख्येच्या चाचणीमध्ये सहाव्या स्थानावर आहे.
मंगळवारी राज्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 3 लाखांच्या जवळ पोहचली आहे.
२५ ऑगस्टपर्यंत एकूण २५.१ लाख नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी जवळपास ७ लाख चाचण्या जलद-प्रतिजैविक व उर्वरित आरटी-पीसीआरमार्फत करण्यात आल्या आहेत.
कोरोना चाचणीत कर्नाटक दोन महिन्यांपूर्वी १७ व्या स्थानावर होत. जूनमध्ये दर दशलक्ष १४ हजार चाचण्यांमधून आता राज्यात ४० हजाराहून अधिक चाचण्या केल्या गेल्या आहेत. जे राष्ट्रीय सरासरी (३०,१००) चाचणीपेक्षा खूपच जास्त आहेत. चाचणीमध्ये कर्नाटकच्या आधी दिल्ली, जम्मू-काश्मीर, आंध्र प्रदेश, आसाम आणि तामिळनाडू. यांचा नंबर लागतो.