बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना लसीची चाचणी लवकरच पूर्ण केली जाईल. नवीन वर्षात ही लस येणे अपेक्षित आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या आरोग्य विभागानेही ही लस देण्याची तयारी सुरू केली आहे. दरम्यान नियमावलीनुसार प्रथम खासगी व सरकारी दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळेल. केंद्र सरकारने आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी ३१ ऑक्टोबरपर्यंत तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. तर इतर वर्गासाठी टप्प्याटप्प्याने लसीकरण केले जाईल असे म्हंटले आहे.
शुक्रवारी राज्य आरोग्य विभागाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लसीकरण व त्यावरील तयारीसंदर्भातील पहिले आरोग्य आयुक्त, आरोग्य विभागाचे अतिरिक्त प्रधान सचिव, राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक आणि मुख्य सचिवांच्या नेतृत्वात जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात बैठक झाली आहे. कोरोना लस उपलब्ध झाल्यावर इतरांना युनिव्हर्सल लसीकरण मोहिमेंतर्गत लसी दिली जाईल.जिल्हा पातळीवर तयारी सुरू झाली आहे.
अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, नर्सिंग कामगार, वैद्यकीय अधिकारी, आयुष डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, वैज्ञानिक, पॅरामेडिकल आणि नर्सिंग विद्यार्थ्यांसह रूग्णालय, क्लिनिक किंवा लॅबमध्ये काम करणारे इतर कर्मचारी यासाठी तयार केले जात आहेत.
इंडियन मेडिकल असोसिएशन, प्रायव्हेट हॉस्पिटल असोसिएशन आणि इंडियन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स यांना आवश्यक मार्गदर्शक सूचनाही देण्यात आल्या आहेत.
कर्नाटक खाजगी वैद्यकीय आस्थापना कायद्यांतर्गत नोंदणीकृत सर्व रुग्णालय प्रमुखांना ऑनलाइन पोर्टल किंवा एसएमएसद्वारे डेटा संकलनात सहकार्य करण्यास सांगितले आहे. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सामुदायिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र, कर्करोग रुग्णालय, टीबी हॉस्पिटल, प्रसूती रुग्णालय, मेडिकल कॉलेज आणि नर्सिंग होम इत्यादी कर्मचार्यांचा समावेश असेल.