बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यातील बळ्ळारी जिल्ह्यात कोरोना लस दिल्यानंतर एका ४३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार शनिवारी त्याला लस दिली होती आणि सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. मात्र, राज्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी त्या व्यक्तीचा मृत्यू या लसीमुळे झाल्याचे निश्चित नसल्याचे म्हंटले आहे.
मृत्यू नंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी विजयनगर वैद्यकीय विज्ञान संस्था (व्हीआयएमएस) येथे पाठविण्यात आला. दरम्यान त्या व्यक्तीला छातीत दुखल्याच्या तक्रारीवरून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, तो वाचू शकला नाही.
जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, मृत व्यक्ती संदूर जनरल हॉस्पिटलचा कर्मचारी होता. मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासह इतर आजारांनी तो ग्रस्त असल्याचे म्हंटले आहे.
विजयनगर वैद्यकीय विज्ञान संस्थानचे संचालक डॉ. बी. देवानंद यांनी पोस्टमार्टम अहवालातच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. प्राथमिक अहवालानुसार, त्या व्यक्तीचा मृत्यू कोरोना लसीमुळे नव्हे तर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजाराने झाला असल्याचे म्हंटले आहे.
लसीकरणानंतर प्रतिकूल परिस्थितीशी संबंधित समितीच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. पण आता पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतरच त्या व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला आहे हे समजेल
.