राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : 400 कोटींची तरतूद : 14 ते 44 वयोगटातील नागरिकांना देणार लस
प्रतिनिधी / बेंगळूर
केंद्र सरकारने 1 मे पासून देशभरात 18 वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने देखील इतर राज्यांप्रमाणे मोठय़ा प्रमाणात लसीचे डोस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीवेळी हा निर्णय घेण्यात आला. 1 कोटी कोव्हिशिल्डचे डोस खरेदी करण्यात येणार असून त्यासाठी 400 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या लसी 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठी वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने सरकारने अनेक उपाययोजना हाती घेतल्या असून त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून लसीकरणावर भर देण्यात येत आहे. केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत सर्व राज्यांना मोफत लस वितरीत केले आहे. मात्र, पुढील लसीकरणाऱया टप्प्यात राज्यांना लसीचे डोस विकत घ्यावे लागणार आहेत.
राज्य सरकारकडून 1 कोटी डोस खरेदी होणार असून त्यासाठी लवकरच कार्यवाही होण्याची शक्यता आहे. परिणामी लस घेण्यासाठी युवा वर्गातून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अनुमोदन
कोव्हिशिल्डचे 1 कोटी डोस खरेदी करण्यास मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी मंत्रिमंडळ बैठकीत अनुमोदन दिले आहे. लसीसाठी कोविन वेबसाईटवर नावनोंदणी केलेल्यांना थेट सरकारी इस्पितळात रांगेत थांबून लस घेता येणार आहे. राज्यात सध्या दररोज 45 वर्षांवरील व्यक्तींना लस देण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात दररोज 3 लाख जणांना लस देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे. जिल्हा आरोग्य विभागाकडून होणाऱया मागणीनुसार लसीचे डोस पुरविण्यात येत आहेत.
राज्याला अतिरिक्त रेमडेसिवीर
कर्नाटकाला आवश्यकतेनुसार अतिरिक्त रेमडेसिवीर औषधे देण्याची विनंती खासदार तेजस्वी सूर्या यांनी केंद्र सरकारकडे केली होती. या विनंतीची दखल घेऊन केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन यांनी तातडीने दखल घेतली आहे. राज्याला दररोज रेमडेसिवीरच्या 25 हजार वायल देण्यास संमती देण्यात आली आहे. तेजस्वी सूर्या यांच्या विनंतीनुसार केंद्राने राज्याला अधिक प्रमाणात रेमडेसिवीर पुरवठा करण्याच आश्वासन दिले आहे.