बेळगाव
कर्नाटक-गोवा आंतरराज्य बससेवेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. शुक्रवारी बेळगाव आगारातून पूर्ववत बसेस गोव्याकडे धावल्या, त्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे साधारण 22 मार्चपासून आंतरराज्य बससेवा बंद झाली होती.
अनलॉक चारमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असून त्यानुसार कर्नाटक-गोवा बससेवेला परिवहन मंडळाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. त्यानुसार शुक्रवारी कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, खानापूर, बागलकोट, आदी आगारातून बसेस गोव्याकडे रवाना झाल्या.
वाहतुकीवरील निर्बंध हटविण्यात आल्याने परिवहन मंडळाने कर्नाटक-गोवा बससेवेला परवानगी दिली आहे. कर्नाटक-गोवा बससेवा सुरु झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला असला तरी कोरोना नियमाचे पालन करत प्रवास करावा लागणार आहे.
विशेष म्हणजे प्रवाशांना कोणत्याही ई-पासशिवाय हा प्रवास करता येणार आहे. त्यामुळे दोन्ही राज्यातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. 17 मे पासून कर्नाटकातील परिवहन मंडळाने जिल्हाअंतर्गत बससेवेला सुरुवात केली होती. मात्र आता लॉकडाऊननंतर पहिल्यांदाचा आंतरराज्य बससेवेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत बससेवा बेळगाव आगारातून सुरु राहणार असल्याची माहिती परिवहन मंडळाने दिली आहे.
पहिल्या दिवशी बऱयाच प्रवाशांना बस सुरु झाल्याची कल्पना नसल्यामुळे प्रतिसाद कमी मिळाला असलातरी येत्या चार-पाच दिवसात प्रवाशांची संख्या वाढेल, अशी आशा परिवहन मंडळाचे विभागीय संचार अधिकारी के. के. लमाणी यांनी व्यक्त केली आहे.