बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. एकीकडे कोरोना रुग्ण वाढत आहेत तर दुसरीकडे लसीकरणाची गती मंदावली आहे. दरम्यान, राज्यात लसीकरण सुरु असून लस उपलब्ध नसल्याने लसीकरण धीम्या गतीने सुरु आहे. कोरोनावर लवकर मात करायची असल्यास लसीकरण हाच एक पर्याय आहे. त्यामुळे रुग्ण वाढत असल्याने लसीकरणाची गती वाढविण्यासाठी राज्य सरकारने मंगळवारी लस उत्पादकांकडून कोविड -१९ लस घेण्यासाठी जागतिक निविदांना आमंत्रित करण्याचा निर्णय घेतला. याद्वारे राज्य सरकार दोन कोटी डोस खरेदी करणार आहे. राज्यात १८-४५ वयोगटातील लसीकरणासाठी लसीची तीव्र कमतरता आहे.
उपमुख्यमंत्री आणि राज्य कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. सी. एन. अश्वथ नारायण म्हणाले की, जागतिक निविदाद्वारे राज्य दोन कोटी कोविड लस डोस घेईल. “याव्यतिरिक्त, आम्ही तीन कोटी लस डोससाठी आणखी एक ऑर्डर आधीच दिली आहे. यामध्ये एक कोटी कोवॅक्सिन आणि दोन कोटी कोविशील्ड लस खरेदी केली जाणार आहे असे, उपमुख्यमंत्री म्हणाले.
“आतापर्यंत आम्ही फक्त केंद्र सरकारने पुरविलेल्या लसींवर अवलंबून होते आणि ते खुल्या बाजारातून खरेदी केले गेले नव्हते. आता निविदा भरण्याचा आणि सात दिवसांत प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, ”असे उपमुख्यमंत्री म्हणाले.