बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे महसूलमंत्री आर. अशोक यांनी कोरोनाच्या कारणास्तव यावर्षी राज्यभरात सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षाच्या उत्सवावर बंदी घातली जाईल, असे म्हंटले आहे.
कोरोना प्रोटोकॉलनुसार लोक त्यांच्या घरात आनंद साजरा करू शकतात.तसेच हॉटेल्सच्या ५० टक्के क्षमतेस उत्सवांना परवानगी देऊ शकतात, असे अशोक म्हणाले.
अशोक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, त्यांनी आणि गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असून लवकरच याबाबत आदेश जारी केले जातील.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जमतात आणि सामाजिक अंतर राखणे अवघड होते आणि कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करता येत नाही. आम्हाला राज्यात कोरोनाची दुसरी लाट थोपवायची आहे, म्हणूनच राज्यभरातील उत्सवांवर बंदी घालणे हे ठरविले गेले आहे, असे ते म्हणाले.
तसेच बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनसंदर्भात मंत्रिमंडळासमोर कोणताही विषय नसल्याचे किंवा प्रस्तावित केले गेले नसल्याचेही अशोक म्हणाले.