बेंगळूर/प्रतिनिधी
आर. आर. नगर आणि सिरा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत कॉंग्रेस आणि जनता दल – एस या दोन्ही विरोधी पक्षांनी भाजप सरकारवर सत्तेचा दुरुपयोग आणि पैशाचा वापर केल्याचा आरोप केला आहे. जद-एसचे राष्ट्रीय अध्यक्ष एच. डी. देवगौडा यांनी सीरा मतदारसंघात भाजप पैशाचा वापरत आहे. या प्रदेशात निवडणूक आचारसंहितेचे तीन तेरा वाजवत आहे.
देवेगौडा यांनी अशा प्रकारच्या प्रकरणांबाबत पक्षाकडून अनेक तक्रारी असूनही स्थानिक पोलीस कोणतीही कारवाई करीत नाहीत. सत्ताधारी पक्षाच्या दबावामुळे प्रशासन गप्प बसले आहे. अशी निवडणूक लोकशाहीची चेष्टा करणारी आहे.
कर्नाटक प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सरकारला सत्तेवरून पायउतार करायला हवे असे ते म्हणाले. मंगळवारी आरआर नगरच्या विधानसभा मतदार संघात विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांच्या प्रचारादरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी अडथळा आणला, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. माहिती देऊनही पोलीस तिथे पोहोचले नाहीत. भाजपच्या कार्यकर्त्यांनीही वातावरण खराब करण्याचा कट रचला आहे. कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी तो उधळून लावला. निवडणूक आयोग, निवडणूक अधिकारी, पोलीस आणि नगरपालिका अधिकारी ही भाजपची कठपुतळी बनली आहे असे ते म्हणाले.