14 डिसेंबर रोजी निकाल
बेंगळूर : प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये 20 स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातील 25 विधान परिषदेच्या जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले. एकूण 25 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान सकाळी 8 वाजता सुरू झाले असून ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे. तर 14 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील. विजापूर, बेळगाव, धारवाड, दक्षिण कन्नड आणि म्हैसूर या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातून प्रत्येकी दोन जागांसाठी निवडणूक होत आहे; तसेच बिदर, गुलबर्गा, उत्तरा कन्नड, रायचूर, बेल्लारी, चित्रदुर्ग, शिवमोग्गा, चिकमंगळूर, हसन, तुमाकुरू, मंड्या, बंगळुरू, बंगलोर ग्रामीण, कोलार आणि कोडागु या मतदारसंघामध्ये प्रत्येकी एक जागेसाठी लढत होणार आहे.
भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी 20 उमेदवार उभे केले आहेत, तर सहा उमेदवार JD(S), 33 अपक्ष आणि उर्वरित लहान पक्षांचे आहेत. चिकमंगळूरमधून एकच महिला उमेदवार आहे. या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश असून विजय प्राधान्य मतांनी ठरवला जातो.
पुढील वर्षी 5 जानेवारी रोजी 25 विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्याने ही निवडणूक होत आहे. 25 MLC पैकी 14 कॉंग्रेसचे, सात भाजपचे आणि चार जेडीएसचे आहेत. सत्ताधारी भाजपला 75 सदस्य असलेल्या वरीष्ठ सभागृहात बहुमत मिळवायचे आहे, त्या दृष्टीने ही निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. या 25 जागांपैकी भाजपला बहुमत स्थापन करण्यासाठी 13 जागांची गरज आहे