बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात ग्रामविकास व पंचायत विभागाच्या कर्मचार्यांना कोरोना योद्धा म्हणून सर्व सुविधा देण्यात येतील. असे राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी म्हंटले आहे. मुख्यमंत्र्यांनी बुधवारी म्हैसूर, शिवमोगा आणि बळ्ळारी जिल्ह्यातील ग्रामपंचायती अध्यक्ष व पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे संवाद साधला.
ते म्हणाले की ग्रामीण भागातील राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या पॅकेज अंतर्गत एसडीआरएफ फंडातून प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येकी 50 हजार रुपयांचे विशेष अनुदान देण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, ग्रामपंचायतींना स्थानिक पातळीवरील कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी 14 व्या आणि 15 व्या वित्त आयोगाकडून मिळालेले अनुदान वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.
संवादादरम्यान मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागात लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की यामुळे ग्रामीण भागातील संक्रमित लोकांची संख्या सातत्याने वाढत आहे. मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी जिल्हा, तहसील व ग्रामपंचायतीच्या प्रशासनाची आहे.