बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक परिवहन कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच आहे. संपाचा तिसरा दिवस सुरु होताच राज्य सरकारने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पर्यायी व्यवस्थेचा भाग म्हणून सेवेत रुजू होण्यासाठी आमंत्रित केले आहे. प्रवाशांचे होणारे हाल टाळण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू होण्याचे आवाहन केले आहे.
परिवहन विभागाने गुरुवारी सायंकाळी जारी केलेल्या अधिसूचनेत ६२ वर्षापेक्षा कमी वयाच्या सेवानिवृत्त कर्मचार्यांना कामावर रुजू होण्यास सांगितले आहे. यासाठी त्यांना चालकाला ८०० रुपये मानधन व वाहकाला ७०० रुपये मानधन देऊन काम करण्यास आमंत्रित केले आहे.
एका निवेदनात म्हटले आहे की, चार महामंडळांच्या ४४६ बसेसनी गुरुवारी पुन्हा कामकाज सुरू केले. सुमारे ४४१२ खासगी बसेसने कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी (केएसआरटीसी), नॉर्थ वेस्टर्न केआरटीसीसाठी २,१८८ आणि ईशान्य केआरटीसीसाठी ४,२७८ प्रवाशांना नेले. दरम्यान, केएसआरटीसीने ३२ प्रशिक्षणार्थींना निलंबित केले तर बीएमटीसीने संपात भाग घेतल्याबद्दल ९६ कर्मचार्यांना निलंबित केले.