बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात होणाऱ्या दोन विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी जेडी(एस) ने आर. आर. नगरमधून पक्षाचा उमेदवार जाहीर केला. कृष्णमूर्ती पंचम हे अधिकृत उमेदवार असतील असे घोषित केले. ते जद (एस) पक्षाच्या ज्ञानभारती युनिटचे प्रमुख आहेत. तर सिरा पोटनिवडणुकीसाठी जेडी(एस) ने दिवंगत आमदार बी.सत्यनारायण यांच्या पत्नीला गेल्या आठवड्यात उमेदवार म्हणून घोषित केले होते. मंगळवारी आर. आर. नगरमधून भाजपने मुनिरत्न यांना उमेदवार जाहीर केल्याने लगेचच जद (एस) नेही आपल्या उमेदवाराची घोषणा केली.
आर. आर. नगरमधील ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर आहे. कृष्णमूर्ती बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहिती जेडी(एस)ने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या आमदाराला अपात्र ठरवल्याने आर. आर. नगरमधील जागा रिक्त होती. दरम्यान कॉंग्रेसने आर. आर. नगरमधून दिवंगत आयएएस अधिकारी डी. के. रवी यांची पत्नी एच. कुसुम यांना उमेदवारी दिली आहे.