बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या निर्णयाच्या विरोधात राज्यातील विविध कन्नड संघटनांनी ५ डिसेंबर रोजी कर्नाटक बंदची हाक दिली आहे.
दरम्यान या बंदला ऑटोरिक्षा आणि टॅक्सी संघटनांसह बहुतांश परिवहन संघटनांनी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, तर हॉटेल मालक संघटनेने ते दिवसभर आपला व्यवसाय बंद करणार नाहीत परंतु या बंदला पाठिंबा असेल असे म्हंटले आहे.
नुकतेच माजी आमदार व कन्नड कार्यकर्ते वटल नागराज यांच्या अध्यक्षतेखाली मराठा विकास प्राधिकरण स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करत कर्नाटक बंदची हाक दिली होती.
बृह बेंगळूर हॉटेल्स असोसिएशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की हॉटेल आणि रेस्टॉरंट्सला आवश्यक सेवा मानल्या जातात आणि कोरोनामुळे हॉस्पिटेलिटी क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. यामुळे, सर्व हॉटेल आणि रेस्टॉरंट्स शेतकरी, मालक, कामगार आणि ग्राहकांच्या हितासाठी खुली असतील.