बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक रस्ते वाहतूक महामंडळातील कामगारांनी पुकारलेल्या संपामुळे बुधवारी राज्यातील सामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. महामंडळ कामगारांच्या संपामुळे बससेवा ठप्प झाल्याने प्रवाशांना दुसरा पर्याय उरलेला नाही. संपामुळे बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत.
दरम्यान बेमुदत बंद संप असल्याने राज्यातील रस्ते वाहतूक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा सामान्य जनतेवर परिणाम होणार आहे. वाहन नसल्याने नागरिकांचे हाल होणार आहेत.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन कर्मचार्यांच्या बॅनरखाली बेंगळूर मेट्रोपॉलिटन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएमटीसी), कर्नाटक स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (केएसआरटीसी), उत्तर पश्चिम कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनडब्ल्यूकेआरटीसी) आणि ईशान्य कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (एनईकेआरटीसी) चे कामगार संपत सहभागी झाले आहेत. सरकारने रस्ते वाहतूक महामंडळाच्या कामगारांना सहाव्या वेतन आयोगानुसार पगाराची अंमलबजावणी करावी अशी मागणी करीत संघटनेने बुधवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.