वार्ताहर/ कंग्राळी खुर्द
कर्नाटक शासनाने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील महसुलात शेकडा 35 टक्क्यावरून एक टक्का केल्याच्या विरोधात कर्नाटकातील सर्व बाजार समित्या सोमवार दि. 21 रोजी बंद ठेऊन आंदोलन करत आहेत. याला बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यापारी संघटनांनी सोमवारी बंद पाळून राज्यव्यापी बंदला पाठिंबा देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
शनिवारी बाजार समितीमधील धान्य व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिवानंद पाटलापूर, सचिव चंद्रकांत भावी यांच्या नेतृत्वाखाली धान्य व्यापारी वर्गाने बाजार समिती अधिकाऱयांना सोमवारी बंदचे निवेदन दिले.
कांदा व्यापाऱयांचा पाठिंबा
बाजार समितीमधील कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विकी (महेश) सचदेव यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोमवारचा बंद करण्यावर चर्चा होऊन सोमवारी सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष राजू पाटील, संभाजी होनगेकर, अशोक पवार, मनोज मत्तीकोप, दीपक पाटील, संदीप मुंगारी, अनिल पावशे, भगवान चौगुले, टी. एस. पाटील, बाबुराव माहिते, निपू काकती, सिद्राय टुमरी, परशराम चौगुले, हुवाप्पा मुतगेकर, गुरुनाथ पिंगट, जोतिबा कटांबळे आदी उपस्थित होते.
रताळी, बटाटा व्यापारी
राजर्षी शाहू सोसायटीच्या सभागृहात रविवार दि. 20 रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष एन. एस. झंगरुचे हे होते. यावेळी सोमवारी बंद ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष चेतन खांडेकर, विक्रमसिंह कदंब पाटील, नृसिंह पाटील, दया पाटील, राजू जाधव, सुरेश नार्वेकर, सुरेश जाधव, राहुल होनगेकर, विनायक होनगेकर, मोहन बेळगुंदकर, दीपक होनगेकर, टी. एस. पाटील, अभिजीत मोरबाळे, माणिक होनगेकर यांच्यासह व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते..