बेंगळूर/प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सोलापूर आणि बेंगळूर दरम्यान ‘रोल ऑन रोल ऑफ’ (आरओआरओ) ही मालवाहतूक रेल्वे रविवारीपासून सुरू होणार आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वेने दिलेल्या निवेदनात याविषयी माहिती दिली आहे.
एसडब्ल्यूआरने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रविवारी सकाळी ०९.१५ वाजता कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्या हस्ते शहरा बाहेरील नीलमंगला स्थानकातून मालाने भरलेले ट्र्क घेऊन ही रेल्वेगाडी रवाना होईल. यावेळी त्यांच्यासमवेत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी, राज्याचे महसूलमंत्री आर. अशोक आणि वरिष्ठ रेल्वे अधिकारी उपस्थित असणार आहेत.
जवळजवळ ६८२ कि.मी. अंतरावर असलेल्या अंतिम स्थानापर्यंत जाण्यासाठी ट्रेनला १७ तास लागतात. या ट्रेनमध्ये जवळपास ४२ ट्रक मालसह वाहून नेले जाऊ शकतात. ही गाडी धर्मवरम, गुंटकाल, रायचूर आणि वाडी मार्गे महाराष्ट्रातील सोलापूरजवळ पोहोचेल.
एसडब्ल्यूआरच्या मते, रोरो सेवा रस्त्यावर होणारे अपघात कमी करते, सुरक्षा सुधारवते, इंधन वाचवते आणि आर्थिक फायदाही होतो. या वाहतुकीतून आवश्यक वस्तू, नाशवंत पदार्थ, खाद्यपदार्थ आणि लहान मालवाहतूक, जलद वाहतूक व्यवस्थित होते. तसेच प्रदूषण कमी करते, तर या वाहतुकीचा खर्च रस्ते वाहतुकीपेक्षा कमी असतो.