बेंगळूर/प्रतिनिधी
देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरु आहे. ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षावरील व्यक्तींना लसीकरण केले जात आहे. दरम्यान कर्नाटकातही तिसऱ्या टप्प्यात लसीकरण सुरु असून अनेक ज्येष्ठ मंडळींसह राजकीय नेते लस घेत आहेत. दरम्यान एका भाजपच्या मंत्र्याने घरी लस घेतल्याने प्रकरण तापलं आहे. कृषी मंत्री बी.सी.पाटील यांना मंगळवारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घरी जाऊन लस दिली. याप्रकरानंतर विरोधी पक्षाने टीका केल्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालिका अरुंधती यांनी हवेरीचे बाल आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद यांना नोटीस बजावली आहे. नोटीसमध्ये त्यांना प्रोटोकॉल तोडण्याचे कारण विचारले गेले.
संचालक अरुंधती यांनी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निश्चित रूग्णालयात लसीकरण करावे. ठरवलेल्या निकषांकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य विभागाची प्रतिमा खराब झाली आहे. या अधिकाऱ्याची चुक आढळल्यास त्याच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे नोटिसात नमूद केले आहे.
कर्नाटकचे कृषिमंत्री बी.सी. पाटील आपल्या घरात कोविड -१९ ची लस घेऊन वादात अडकले असल्याची माहिती आहे. यासंदर्भात केंद्राने राज्य सरकारकडे अहवाल मागविला आहे.
मंत्री पाटील आणि त्यांची पत्नी यांना हावेरी जिल्ह्यातील हिरेखेर येथील निवासस्थानी लसीकरण करण्यात आले. दरम्यान त्यांच्याच पक्षाचे नेते राज्याचे आरोग्यमंत्री के. सुधाकर आणि इतरांनी यावर टीका केली आहे.