आरटीपीसीआरमध्ये शिथिलता, आंतरराज्य बससेवा सुरू करण्यासाठी हालचाली
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाचा प्रादूर्भाव आणि सीमाहद्दीवर करण्यात आलेल्या आरटीपीसीआर सक्तीमुळे काही महिन्यांपासून बंद असलेली कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा लवकरच सुरू होणार आहे. सीमाहद्दीवरील कोरोना चाचणीच्या अहवालाची सक्ती शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसदेखील महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेने धावणार आहेत. तर महाराष्ट्राच्या संपावर असलेल्या बसदेखील संप मागे घेताच कर्नाटकात धावण्यास परवानगी दिली जाणार आहे. त्यामुळे कर्नाटक-महाराष्ट्र आणि सीमाहद्दीवरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमाहद्दीवर चेकपोस्ट नाके उभारण्यात आले आहेत. याठिकाणी आरटीपीसीआरची सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची लालपरी मागील काही महिन्यांपासून कर्नाटकात धावली नाही. कर्नाटकच्या काही मोजक्मया बसेस महाराष्ट्रात धावत आहेत. त्यामुळे प्रवासीवर्गाची मोठी गैरसोय होत आहे. दरम्यान खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याने प्रवाशांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
कोरोनापूर्वी बेळगाव विभागातून 90 हून अधिक बस महाराष्ट्रात धावत होत्या. या बसच्या माध्यमातून परिवहनला चांगला महसूल मिळत होता. महाराष्ट्रातूनही 80 बसेस कर्नाटकातील विविध शहरांकडे धावत होत्या. त्यामुळे महाराष्ट्र महामंडळालाही उत्पन्न मिळत होते. मात्र दोन्ही राज्यांची आंतरराज्य बससेवा कोलमडल्याने दोन्ही परिवहन मंडळांचे आर्थिकदृष्टय़ा नुकसान झाले आहे. बेळगाव विभागाला एकूण उत्पन्नापैकी महाराष्ट्रात धावणाऱया बसच्या माध्यमातून 40 टक्के उत्पन्न मिळते. मात्र मागील काही महिन्यांपासून बससेवाच विस्कळीत झाल्याने अधिक उत्पन्नापासून दूर रहावे लागले आहे.
बेळगाव बसस्थानकातून कोल्हापूर जिल्हय़ातील नेसरी, कोवाड, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, हलकर्णी आदी भागात बस धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांची सोय व्हायची. मात्र बससेवाच ठप्प झाल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
सीमाहद्दीवरील आरटीपीसीआर शिथिल
शासनाने महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱया प्रवाशांना केलेली आरटीपीसीआरची सक्ती मागे घेतली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची लालपरी आता कर्नाटकात पुन्हा पूर्ववत धावणार आहे. सीमाहद्दीवरील आरटीपीसीआर शिथिल करण्यात आल्याने दोन्ही राज्यांची बससेवा पूर्ववत सुरू होणार आहे.
लालपरीची लवकरच एन्ट्री
सीमाहद्दीवरील आरटीपीसीआरमध्ये शिथिलता देण्यात आल्याने लवकरच महाराष्ट्राची लालपरी कर्नाटकात एन्ट्री करणार आहे. मागील काही महिन्यांपासून लालपरी सीमाहद्दीपर्यंत धावत होती. आता काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्याने लवकरच कर्नाटकात धावणार आहे.
के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी-केएसआरटीसी)
आरटीपीसीआरमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे लालपरीला बेळगावला यायला परवानगी आहे. याबरोबरच परिवहनच्या बसदेखील महाराष्ट्रात पूर्ण क्षमतेने पूर्वीप्रमाणे धावतील. लवकरच दोन्ही राज्यांची आंतरराज्य बससेवा सुरळीत सुरू होणार आहे.