विजय हजारे चषक स्पर्धेतील उपांत्य लढती आज- दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रथमश्रेणी क्रिकेटमधील दोन अव्वल संघ मुंबई व कर्नाटक हे आज (गुरुवार दि. 11) विजय हजारे चषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आमनेसामने भिडणार असून या निमित्ताने देशातील दोन अव्वल सलामीवीर पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल एकमेकांसमोर येतील. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बेळगावच्या रोनित मोरेने कर्नाटक संघातर्फे 36 धावात 5 बळी घेतले होते. त्याची पुनरावृत्ती तो येथेही करणार का, याची आज उत्सुकता असेल. स्पर्धेतील दुसरी उपांत्य लढत गुजरात विरुद्ध उत्तर प्रदेश अशी होणार आहे. दोन्ही सामन्यांना सकाळी 9 वाजता प्रारंभ होईल.
कर्नाटकचा सलामीवीर देवदत्त पडिक्कल सलग 4 लिस्ट ए शतके झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला असून यंदाच्या विजय हजारे चषक स्पर्धेत सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत तोच अव्वलस्थानी आहे. त्याच्या खात्यावर 673 धावा आहेत तर मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉ (589 धावा) देखील त्याच्यापेक्षा फारसा मागे नाही.
पृथ्वी शॉ मुंबईचे नेतृत्व भूषवत असून पुडूच्चेरीविरुद्ध नाबाद 227 धावा झळकावल्या, त्यावेळी या स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली. त्याने मंगळवारी सौराष्ट्रविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत नाबाद 185 धावांची आतषबाजी करत लिस्ट ए लढतीत धावांचा पाठलाग करताना सर्वोच्च धावांचा भारतीय विक्रमही आपल्या खात्यावर केला. यावेळी महेंद्रसिंग धोनी, विराट कोहलीसारख्या अव्वल फलंदाजांचे विक्रम त्याने मागे टाकले.
दोन्ही फलंदाजांचा कस लागणार
आता दोन्ही संघ उपांत्य फेरीत आमनेसामने उभे ठाकले असताना एकीकडे देवदत्त पडिक्कल तर दुसरीकडे पृथ्वी शॉ या दोन्ही फलंदाजांची प्रतिष्ठा देखील एका अर्थाने पणाला लागली तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही. इंग्लंडविरुद्ध आगामी 3 वनडे सामन्यांची मालिका होणार असून त्या पार्श्वभूमीवर, पडिक्कल राष्ट्रीय निवड समितीसमोर आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवण्याचा प्रयत्न करेल, हे साहजिक आहे. दुसरीकडे, पृथ्वी शॉला देखील ही संधी वाया घालवणे परवडणारे नसेल.
कर्नाटकची गोलंदाजी सरस
कर्नाटक संघात मनीष पांडे, जलद गोलंदाज रोनित मोरे, एम. प्रसिद्ध कृष्णा, अष्टपैलू श्रेयस गोपाल, फिरकीपटू के. गौतम यांच्यासारखे अनुभवी खेळाडू असून काही प्रमाणात मुंबईपेक्षा त्यांचे पारडे जड असू शकेल. मुंबईचा संघ नियमित कर्णधार श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव व जलद गोलंदाज शार्दुल ठाकुर यांच्याशिवाय मैदानात उतरणार आहे.
कर्नाटकसाठी कर्णधार रविकुमार समर्थचा बहारदार फॉर्म ही देखील आणखी एक जमेची बाजू आहे. समर्थने या वर्षात सर्वाधिक धावा जमवणाऱया फलंदाजांच्या यादीत दुसऱया स्थानी मजल मारली आहे. सध्या त्याच्या खात्यावर 605 गुण आहेत. समर्थने यापूर्वी केरळविरुद्ध उपांत्यपूर्व लढतीत 192 धावांची आतषबाजी केली आणि आता आणखी एकदा अशीच तडफदार खेळी साकारण्याचा त्याचा इरादा असेल.
मुंबई बाजी पलटवणार का?
यापूर्वी 2018-19 मध्ये मुंबईने ही स्पर्धा जिंकली होती. यंदाची स्पर्धा बाद फेरीत पोहोचलेली असताना मध्यमगती गोलंदाज धवल कुलकर्णीचा फॉर्म त्यांच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरु शकतो. धवलने आतापर्यंत 13 बळी घेतले आहेत. मुंबईचे फिरकी गोलंदाज शम्स मुलाणी, प्रशांत सोळंकी, तनूष कोटियन व अष्टपैलू शिवम दुबे यांचे योगदानही महत्त्वाचे ठरु शकते.
दुसऱया उपांत्य लढतीत कर्णधारांची भूमिका महत्त्वाची
या स्पर्धेतील दुसरी उपांत्य लढत गुजरात व उत्तर प्रदेश यांच्यात रंगणार असून यात दोन्ही संघांच्या कर्णधारांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरेल, असा होरा आहे. तूर्तास, गुजरातचे नेतृत्व प्रियंक पांचाळकडे तर उत्तर प्रदेशचे नेतृत्व कर्ण शर्माकडे आहे.
उपांत्य फेरीची लाईनअप
1) मुंबई वि. कर्नाटक, ठिकाण- एअरफोर्स ग्राऊंड (सकाळी 9 वा.)
2) गुजरात वि. उत्तर प्रदेश, ठिकाण-अरुण जेटली स्टेडियम (सकाळी 9 वा.)