बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे नवीन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई नवी दिल्लीला पोहोचलेआहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा राष्ट्रीय राजधानीला पहिला दौरा आहे. गृहराज्यमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेणार आहेत.
दरम्यान, बी. एस. येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर मंगळवारी भाजप विधिमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून निवड झालेल्या बोम्माई यांनी बुधवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांनतर त्यांनी गुरुवारी उत्तर कन्नड जिल्ह्याच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्यानंतर ते आज पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी दिल्लीत दाखल झाले.
दरम्यान, गुरुवारी बोम्माई यांनी कर्नाटकमधील पत्रकारांना सांगितले होते की, ते राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्यावर केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील. ते म्हणाले की, “जेव्हा मी पक्षाच्या नेतृत्वाला भेटण्यासाठी दिल्लीला जातो, तेव्हा कर्नाटकातील आमचे खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांची बैठक प्रलंबित राहणाऱ्या प्रकल्प आणि राज्याशी संबंधित मुद्द्यांबाबतही चर्चा करण्याचा प्रयत्न करतो,” असे ते म्हणाले होते.