म्हैसूर /प्रतिनिधी
राज्यात अनेक राजकीय नेत्यांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात म्हैसूरचे पोलीस अधीक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यांनतर आता म्हैसूरचे पोलीस आयुक्त चंद्रगुप्त यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस आयुक्तांनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
म्हैसूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रगुप्त यांच्यात कोरोनाची सौम्य प्रमाणात लक्षणे असल्याने ते घरी अलग राहून उपचार घेत आहेत.
दरम्यान, डीसी कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच म्हैसूरचे उपायुक्त अभिराम जी. शंकर यांनी स्वत: ला क्वारंटाईन केलं आहे.
मंगळवारी म्हैसूरमध्ये १, ३२१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदली गेली आहेत. म्हैसूरमध्ये एकूण १३,९२९ कोरोनाचे रुग्ण आहेत. मंगळवारी, म्हैसूरमध्ये ४६९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर १६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती म्हैसूरच्या जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिली आहे.