बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यसभेचे खासदार अशोक गस्ती यांचे कोरोना, न्युमोनियामुळे निधन झाले. गस्ती यांना कोरोना न्युमोनिया झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण गुरुवारी रात्री त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. खासदार गस्ती हे ५५ वर्षाचे होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून अशोक गस्ती यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी ट्विटमध्ये लिहिले की, राज्यसभेचे खासदार अशोक गस्ती हे कर्नाटकमध्ये पक्षाला बळकट करण्यासाठी खूप परिश्रम घेणारे एकनिष्ट कार्यकर्ते होते. त्यांना समाजातील गरीब व उपेक्षित घटकांच्या सबलीकरणाची आवड होती. त्यांच्या कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. ओम शांती.
खासदार गस्ती यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मणिपाल रुग्णालयाने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे, २ सप्टेंबर रोजी मणिपाल हॉस्पिटल, ओल्ड एअरपोर्ट रोड येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण राज्यसभेचे खासदार अशोक गस्ती यांचे गुरुवारी रात्री १०.३१ वाजता निधन झाले.
अशोक गस्ती हे वयाच्या १८ व्या वर्षांपासून भाजपमध्ये होते. 22 जुलैला त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली होती. अशोक गस्ती हे कर्नाटक मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष होते. कर्नाटक भाजप युवा मोर्चाचे ते माजी अध्यक्ष होते. शिवाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) ते स्वयंसेवक होते. कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यात भाजपला संघटीत बनवण्याचे श्रेय त्यांना दिले जात होते.