बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी मंगळवारी सांगितले की राज्य आता संपूर्ण कोविडमुक्तीकडे वाटचाल करत आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत १० लाखाहून अधिक जणांना लसीकरण करण्यात आले आहे.
कोविडमुक्त राज्याकडे वाटचाल करताना सोमवारी ८ मार्च रोजी राज्यात १० लाख लसीकरणाचा टप्पा ओलांडला. तर ८ मार्च रोजी ७३,२६९ लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.आतापर्यंतच्या एकाच दिवसात हे सर्वात जास्त लसीकरण आहे, असे सुधाकर यांनी ट्विट करून सांगितले आहे.
कर्नाटकात १ मार्चपासून केवळ आठ दिवसांत ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एक लाखाहून अधिक वृद्धांना सुरक्षितपणे लसीकरण करण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या मते, ८ मार्च रोजी एकाच दिवशी ३२,१८३ ज्येष्ठ नागरिकांसह ५५,६१२ नागरीकांना लसीकरण केले गेले.
१६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू झाल्यापासून राज्यात दोन एईएफआय आणि २१ गंभीर एईएफआय घटनांची नोंद झाली आहे.