शनिवारी 70 कोरोनाबाधितांचा बळी : 880 जण संसर्गमुक्त
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात लॉकडाऊन जारी करण्याची मागणी होत असतानाच दुसरीकडे रुग्णसंख्येचा आलेख वाढतच चालला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यातील एकूण रुग्णसंख्या 35,261 वर पोहोचली आहे. तर मागील आठवडभरात राज्यात 14,658 रुग्णांची भर पडली आहे. शनिवारी आतापर्यंतची दिवसातील उच्चांकी 2,798 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील 24 तासांमध्ये 70 रुग्णांचा बळी गेला आहे. तर 880 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत.
राज्यात कोरोनाबळींचा आकडाही सातत्याने वाढत आहे. आतापर्यंत 613 रुग्णांचा बळी गेला आहे. शनिवारी 70 जण दगावले असून त्यामध्ये बेंगळूर शहर जिल्हय़ातील 23 जणांचा समावेश आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 35,261 इतकी झाली असून आतापर्यंत 14,716 जण संसर्गमुक्त झाले आहेत. तर उपचारातील रुग्णसंख्या 20,883 इतकी आहे.
मागील चोवीस तासात बेंगळूर शहर जिल्हय़ात 1533, मंगळूर जिल्हय़ात 186, उडुपी 90, म्हैसूर 83, तुमकूर 78, धारवाड 70, यादगीर 74, दावणगेरे 72, गुलबर्गा व बळ्ळारीत प्रत्येकी 65, बिदर 63, विजापूर 48, कारवार व गदरमध्ये प्रत्येकी 40, बागलकोट 37, हासन 34, रामनगर 30, शिमोगा 26, मंडय़ा व कोप्पळ प्रत्येकी 23, चिक्कबळ्ळापूर 20, चामराजनगर 17, हावेरी 16, रायचूर 14, कोलार व कोडगूमध्ये प्रत्येकी 12, चित्रदुर्ग 9, बेंगळूर ग्रामीण 5, बेळगाव व चिक्कमंगळूर जिल्हय़ात प्रत्येकी 3 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
विजापूर जिल्हय़ात 48 नवे रुग्ण सापडले आहेत. तर दिवसभरात 17 जणांना डिस्चार्ज मिळाला. तसेच 65 वर्षीय पुरुष आणि 72 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या जिल्हय़ातील एकूण रुग्ण संख्या 758 इतकी असून आतापर्यंत 480 जण संसर्गमुक्त झाले आहेत. उपचारातील रुग्णसंख्या 263 इतकी आहे.