बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना राज्याचे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने राज्यात पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. पूर्ण लॉकडाऊनची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान राज्यात १० मे ते २४ मे पर्यंत पूर्ण लॉकडाऊन लागू केला होता. त्यांनतर पुन्हा लॉकडाऊन वाढवून ७ जूनपर्यंत केला. राज्यात लॉकडाऊननंतर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. परंतु राज्यात ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण भागातील कोरोनावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. दरम्यान, राज्यात ७ जूननंतर लॉकडाऊन कायम राहणार का याबाबत निर्णय झाला नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा म्हणाले की, कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेऊन राज्यात लॉकडाऊन वाढविण्याच्या बाबतीत कोणताही निर्णय झाला नाही. सध्याचा लॉकडाऊन संपण्याच्या दोन दिवस अगोदर त्यांचे सरकार ५ जूनला लॉकडाऊन वाढविण्याच्या निर्णयावर विचार करेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, राज्यात ७ जून, सकाळी ६ वाजेपर्यंत वाढीव बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान केंद्राच्या निर्देशानुसार राज्यात लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढविण्यात येऊ शकतो, असे संकेत देत कर्नाटकचे मंत्री बसवराज बोम्माई यांनी शनिवारी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आपल्या मंत्र्यांची बैठक घेऊन निर्णय घेतील, असे सांगितले.
कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी सांगितले की, “आम्ही ७ जून पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे आणि त्याची अंमलबजावणी पूर्णपणे केली जाईल. केंद्रीय गृह मंत्रालयाने मार्गदर्शन केले आहे की ३० जूनपर्यंत कठोर उपाययोजना कराव्यात” असे कर्नाटकचे गृहमंत्री म्हणाले.