प्रतिनिधी / बेळगाव
कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे भरतेश हायस्कूल येथे कर्तव्य बोध दिवस साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील होते. व्यासपीठावर भरतेश संस्थेचे कार्यवाह राजीव दोड्डण्णावर, भरतेश हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एन. आंची, संघाचे सचिव उमेश कुलकर्णी, राज्य सचिव आर. पी. वंटगुडी, महिला विभाग प्रमुख नवीना शेट्टीगार, उपाध्यक्षा प्रिया सायनेकर उपस्थित होते.
प्रारंभी स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रा. अनिल चौधरी यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. उमेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांचे स्वागत करून कर्तव्य बोध दिवसाची शपथ देवविली.
यावेळी प्रमुख वक्ते प्रा. अनिल चौधरी म्हणाले, क्रियाशील शिक्षकच सृजनशील विद्यार्थी घडवू शकतो. ज्ञानार्जन करताना आपण चुकणार नाही याची काळजी घ्या, स्वामी विवेकानंद व सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श विद्यार्थ्यांना समजावून सांगा, शिक्षक हा उत्तम कलाकार असला पाहिजे, विद्यार्थ्यांना गायन, अभिनयातून शिक्षण दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी भरतेश हायस्कूलचे कार्यवाह राजीव दोड्डण्णावर व कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी विचार व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा खजिनदार सुरेश कळेकर, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम कुडतुरकर, शहराध्यक्ष संजीव कोष्टी, सचिव रवी अंगडी, मुख्याध्यापक एन. ओ. डोणकरी यासह शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन नायम गौडा यांनी केले तर महावीर चौगुले यांनी आभार मानले.