बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने कर्नाटकातील रूग्णालयांसाठी दररोज १,२०० मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजनचे वाटप होते ते आता ५४ टक्क्यांनी कमी झाले आहे. सरकारने रुग्णालयांना केला जाणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी केला आहे. दरम्यान राज्यात लॉकडाउनच्या आधी कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती तेंव्हा ऑक्सिजनची मागणीही वाढत होती. आता रुग्णसंख्येत घट झाल्याने ऑक्सिजनची मागणीही कमी झाली आहे.
रुग्णालयांना दैनंदिन वापरामध्ये दररोज सुमारे ८३० मे.टन ऑक्सिजनची आवश्यकता होती. या ऑक्सिजनच्या सरासरीच्या तुलनेत ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. अलिकडच्या दिवसात ते प्रमाण ५२९ मेट्रिक टन झाले आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासाठी राज्य नोडल अधिकाऱ्यांनी ९ जून रोजी राज्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे सुधारित वाटप केले. यावेळी त्यांनी ५५२ मेट्रिक टन ऑक्सिजनचे वाटप केले. बेंगळूरसाठी त्यांनी १८० मे. टन. ऑक्सिजन दिला. कारण या ठिकाणी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.